सांगली - राज्यातील सहकाराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकाकडून सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील उसाच्या एफआरपीबाबत येत्या 28 जानेवारीला मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - प्रभू श्रीरामाची कृपा..! मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी
राज्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी बुधवारी पहिल्यांदाच सांगलीमध्ये उपस्थिती लावली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री कदम यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी कदम म्हणाले, देशातील 65 टक्के सहकार हा एकट्या महाराष्ट्र राज्यात आहे. पण, मागील काळात सहकाराची परिस्थिती फारशी चांगली राहिली नाही. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील सहकाराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेतले जातील, असा विश्वास मंत्री कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल. आधीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार वेगळी आहे. त्यामुळे या घोटाळ्यात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर हे सरकार नक्की कारवाई करेल, असेही कदम यांनी सांगितले.
हेही वाचा - आत्महत्या केलेल्या धर्मा पाटलांच्या स्मरणार्थ शेतकरी संघटनेचे सांगलीत आंदोलन