सांगली - राज्यात यंदा उसाचे क्षेत्र जास्त आहे. यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये, म्हणून राज्यातील बंद असलेले 40 साखर कारखाने तातडीने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. ते विटा येथे माध्यमांशी बोलत होते.
राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले, की गेल्या वर्षापासून आणि यावर्षीही उसाचे अधिक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये झाले आहे .त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे 100 टक्के गाळप व्हायला पाहिजे. तसेच बंद असलेल्या साखर कारखान्यांमुळे ऊस शिल्लक राहू नये, यासाठी महाराष्ट्रामध्ये बंद पडलेले साखर कारखाने लवकरात लवकर सुरू कसे होतील, यावर बैठक घेण्यात आली आहे. यंदा बंद पडलेले साखर कारखाने विक्रमी आकड्यात सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे. बंद असलेले 40 साखर कारखाने तातडीने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
हेही वाचा-आर्यनच्या आरोग्याबद्दल जेलमधील अधिकारी चिंतेत
ऊस गाळपाविना राहणार नाही-
उसाचे क्षेत्र जरी मोठया प्रमाणावर वाढले असले तरी ऊस गाळपाविना राहणार नाही, असे चित्र या निर्णयामुळे दिसणार आहे. या महिन्यात काही साखर कारखाने सुरू होणार आहेत. काही कारखाने तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे 100 टक्के गाळप होईल. ऊसाला हे सगळे कारखाने योग्य दर देतील, याची जबाबदारी सहकार खात्याच्या माध्यमातून आम्ही घेऊ,असा विश्वासही विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-उसाला मिळणार आजपर्यंतचा सर्वाधिक हमीभाव; प्रति क्विंटल 290 रुपये एफआरपीची केंद्राकडून घोषणा
दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी जंरडेश्वर, दौंड शुगरसह विविध साखर कारखान्यांत घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे साखर कारखानदारीतील घोटाळे हा सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे.