सांगली - सांगली-इस्लामपूर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रस्त्यात खड्डे हा जनतेशी खेळ बरा नाही, तुम्ही लोक राज्याचे वाटोळे करत आहात, अशा शब्दात टीकास्त्र सोडलं आहे. तसेच सेल्फी विथ खड्डे काढणाऱ्या सुप्रियाताईंनी इस्लामपूर या ठिकाणी येऊन सेल्फी विथ खड्डे काढावे आणि राज्याचे नेतृत्व करणाऱ्या जयंत पाटील यांना पाठवावे, असा टोलाही विक्रांत पाटील यांनी लगावला आहे. सांगलीमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
खड्ड्यांमुळे विलंब
सांगलीमध्ये शनिवारी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाव नोंदणी आणि कार्यकर्ता बैठक पार पडली. भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मात्र पाटील यांना कार्यक्रमस्थळी येण्यास विलंब झाला. सांगली-इस्लामपूर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आपल्याला विलंब झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सांगली इस्लामपूर या रस्त्याची पूर्णत: चाळण झाली आहे, रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीचे इस्लामपूर-वाळवा मतदारसंघाचे आमदार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
सुप्रियाताई इस्लामपुरचेही सेल्फी विथ खड्डे काढा..
यावेळी विक्रांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपा सत्तेत असताना काढलेल्या खड्डे विथ सेल्फीची आठवण करून दिली. खड्यांसोबत सेल्फी काढणाऱ्या सुप्रियाताई सुळे यांनी या सांगली-इस्लामपूरमध्ये येऊन खड्ड्यांसोबत सेल्फी काढावा आणि राज्याचे नेतृत्व करणाऱ्या जयंत पाटलांना पाठवा, असा खोचक टोला ही लगावला आहे.