जत - (सांगली) जत तालुक्यातील बिळूर, बनाळी, दरिबडची या ठिकाणी शासकीय धान्य साठा वाहून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात आलेला धान्यसाठी जप्त केला आहे. पकडण्यात आलेल्या वाहनांवर व वाहनांच्या चालक मालकांवर जीवनावश्यक वस्तूची बेकायदेशीर वाहतूकप्रकरणी गुन्हे दाखल करणेत आलेले आहेत. महसूल व पुरवठा विभागाकडून वाहन, चालक, दुकानदार व परिसरातील रास्त भाव धान्य दुकानदारांची कसून चौकशी केली जात असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसिलदार सचिन पाटील यांनी दिली आहे.
संबंधितांची कसून चौकशी चालू असून जनतेच्या तक्रारीवरुन व ग्रामस्थांनीच रंगेहात वाहने पकडून दिल्याने हा माल रेशनिंग लाभार्यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल विभागाने बिळूर, बनाळी, डफळापूर, दरिबडची येथील दुकानांची कसून चौकशी व तपासणी करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. या प्रकरणी दोषीं रेशन दुकानदारांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे.
लाभार्थ्यांना आवाहन -
दरम्यान, तालुक्यातील योजनापात्र लाभार्थ्यांनी रास्त भाव धान्य दुकानदाराकडून पॉस मशिनव्दारे धान्य खरेदी केल्यानंतर रोखीची पावती घ्यावी व पावतीनुसार होणारी रक्कमच दुकानदारास दयावी. दुकानदार पावती देणेस टाळाटाळ व नकार देत असलेस त्याबाबतची लेखी तकार ग्रामस्तरावरील दक्षता कमिटी अध्यक्ष व सरपंच, सदस्य, सचिव तलाठी यांचेकडे करणेत यावी.
तात्काळ आधार नोंंदणी करण्याचे आवाहन -
तसेच तालुक्यातील जे अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजना लाभार्थी आहेत व ज्यांचे नावाची पॉस मशिनवर १२ अंकी नंबर नोंद आहेत, अशा पात्र शिधापत्रिका धारकास कार्डातील एका सदस्याचा पॉस मशिनवर अंगठा लावून सदर योजनांचा लाभ दिला जात असतो. ऑनलाईन वितरणप्रणाली आधारशी निगडीत असलेने शिधापत्रिकांतील सर्व सदस्यांचे आधार कार्ड पॉस मशिनला जोडणी करणे अत्यावश्यक असलेने ज्या योजनापात्र शिधापत्रिकांतील लाभार्थ्यांनी अदयापी आधारकार्ड जोडणीसाठी दुकानदारांकडे दिलेले नाही त्यांनी ते तात्काळ देणेची कार्यवाही करावी.