सांगली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भित्रा म्हणणाऱ्याला संसदेत पाठवू नका, असे आवाहन करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. इस्लामपूरमध्ये आयोजित हातकणंगले मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून धैर्यशील माने हे निवडणूक लढवत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या विरोधात माने यांची लढत आहे. गेल्या वेळी युतीकडून लढणारे राजू शेट्टी यावेळी काँग्रेस महाआघाडीमधून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात युतीच्या धैर्यशील माने यांनी चांगलीच टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. आज धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सांगलीच्या इस्लामपूरमध्ये महायुतीची विजय संकल्प सभा झाली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेसाठी शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही युती केली, ती चांगली आणि जास्त मंत्री पदे द्या म्हणून नाही, तर शेतकऱ्यांसाठी आणि देशहिताचे निर्णय घेण्यासाठी. शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, आम्हाला शेतीतील काही कळत नाही असे म्हणता मग तुम्हाला क्रिकेटमधील काय कळत ? मी शेतकरी नेता नाही पण शेतकरी मित्र नक्की आहे, असा टोला यावेळी उध्दव ठाकरे यांनी लगावला.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, सावरकर यांना इंग्रजांनी ज्या तुरुंगात ठेवले होते. तो तुरुंग मी प्रत्यक्ष जाऊन पाहिले आहे. १४ वर्षे जी शिक्षा भोगली, त्याची माहिती आहे. स्वातंत्र्यासाठी सावरकरांइतका त्याग जवाहरलाल नेहरू यांनी केला आहे का?
स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले ,गेल्या निवडणुकीत चुकीच्या माणसाला ही जागा दिली. शेट्टी यांना पाठिंबा देणे ही माझी मोठी चूक झाली, पण आता तुम्ही माझी चूक दुरुस्त करून धैर्यशील माने यांना विजयी करा.