सांगली - जिल्ह्यातील जतनजीक असणाऱ्या तिप्पेहळी गावाच्या हद्दीतील पाझर तलावात बुडून दोघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या दोघी जनावरे चरवण्यासाठी गेल्या असता हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. सानिका रामा भिषे (वय 9) आणि कोमल रामा भिषे (वय 6) असे मृत पावलेल्या दोन बहिणींची नावे आहेत.
जत शहरातील काही अंतरावर तिप्पेहळी गावच्या हद्दीत असणार्या चव्हाण वस्ती येथील पाझर तलावाच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. जतजवळील माने वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या दोघी शिकत होत्या. यातील सानिका ही चौथीच्या वर्गात तर कोमल पहिलीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी १२ च्या सुमारास त्या दोघी जनावरे घेऊन चरवण्यास गेल्या होत्या. दरम्यान, जवळच असलेल्या पाझर तलावात खेळता-खेळता कोमल हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. यावेळी तिला वाचवण्याकरता गेलेली सानिका हीदेखील पाण्यात पडली. खोल पाणी आणि मुलींना पाण्यात पोहता येत नसल्याने त्या दोघी एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्यात बुडाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या बहिणींच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - जिल्ह्यातील 8 मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट, 68 जण रिंगणात
हेही वाचा - सांगलीत एका मतदारसंघात सेनेची, तर ३ मध्ये भाजपची बंडखोरी