सांगली - चारचाकी आणि दुचाकीच्या समोरा-समोर धडकेत दीर-भावजय ठार झाल्याची घटना सांगली-इस्लामपूर मार्गावरील मिरजवाडीत येथे घडली. यामध्ये ८ वर्षाचा मुलगाही जखमी झाला आहे. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या घटनेमुळे इस्लामपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या भीषण अपघातात दुचाकीस्वार शिवाजी बाळासो मोहीते (वय - ६०), सविता तानाजी मोहिते (वय, ४५) राहणार इस्लामपूर हे दीर भावजय ठार झाले आहेत. तर सविता यांचा ८ वर्षाचा मुलगा विशाल तानाजी मोहीते हा गंभीर जखमी झाला आहे.
मोहीते हे इस्लामपुरच्या यल्लामा चौक येथे राहत होते. त्यांचा हातगाडीवर केळी विक्रीचा व्यवसाय होता. रविवारी काही कामानिमित्ताने ते सांगलीला आले होते. काम आटपून परत इस्लामपूरकडे आपल्या यादुचाकीवरून निघाले होते. यावेळी आष्टा नजीकच्या मिरजवाडीजवळ इस्लामपूरहून सांगलीकडे येणाऱ्या भरधाव इंडिकाचा आणि दुचाकीची समोरा-समोर जोरदार धडक झाली. ज्यात शिवाजी मोहिते हे जागीच ठार झाले, तर सविता मोहिते व विशाला मोहिते हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, यामधील सविता मोहीतेंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर विशालवर उपचार सुरू आहेत. या घटनेची आष्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. तर या घटनेमुळे इस्लामपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.