सांगली - हृदय विकाराचा तीव्र झटका आलेल्या मित्राला मिरज येथील रूग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना गाडीचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मिरज-पंढरपूर मार्गावरील कुची येथे हा भीषण अपघात घडला. मृत आणि जखमी हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
या अपघातात चालक लक्ष्मण आण्णाप्पा चंदनवाले (वय 35) आणि रामचंद्र हणमंत वाघ (वय 32) हे जागीच ठार झाले. रेवण आप्पाराव वाघ (वय 48) आणि नागेश कानिफनाथ मोरे (वय 23) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा - गंभीर! मुंबईत आढळले 52 नवे कोरोनाग्रस्त, एकूण रुग्णांची संख्या ३३० वर
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील रोपळे येथील रेवण वाघ यांना रात्री हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांचे मित्र दयानंद कदम यांची गाडी घेऊन रेवण यांच्यासह त्याचे चार मित्र मिरजेकडे जाण्यास निघाले. दरम्यान, सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावच्या हद्दीत मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव असणारी गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली.