सांगली - ऐतिहासिक बाजारपेठेला आता घरघर लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कमिशन, हमाली, सेस आणि सेवाकर नोटीस यामुळे गेल्या वर्षभरात हळद आणि गुळाच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. यात तब्बल २७० कोटींच्या व्यवहारात घट झाली आहे. परिणामी बाजार समितीचा दीड कोटींचा सेस बुडाला आहे. त्यामुळे व्यापारी आणि बाजार समिती चिंतेत आहे.
सांगली कृषी उत्पन्न समिती राज्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथील हळद आणि बेदाणा जगाच्या पाठीवर पोहोचला आहे. मात्र, आज नावाजलेल्या सांगलीच्या बाजारपेठेला घरघर लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण बाजार समितीमधील व्यापारी, अडते, हमाल हे बाजार समितीच्या वाढीव खर्चामुळे त्रस्त आहेत. यामुळे हळदीचा आणि गुळाचा व्यापार अडचणीत सापडला आहे. गूळ आणि हळदीच्या खरेदीदारांवर लावण्यात येणारे ३ टक्के कमीशन, वाढलेली हमाली, बाजार समितीचा सेस आणि व्यापाऱयांना केंद्र सरकारने बजावलेल्या सेवाकर नोटीसा यामुळे व्यापार मेटाकुटीला आला आहे.
परिणामी हळद आणि गुळाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या बाजारपेठेत गेल्या वर्षभरात खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले आहेत. बाजार समितीमधील कमीशन आणि हमाली देण्याऐवजी गुळाच्या गुऱ्हाळ घरावरून आणि हळदीची थेट शेतातून वाढती खरेदी यामुळे २०१८-१९ मध्ये सांगली बाजार समितीतील हळद आणि गुळाची उलाढाल सुमारे २७० कोटींनी कमी झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हळदीची आवक ३ लाख ४८ हजार तर, गुळाची आवक १ लाख ४७ हजार क्विंटलने कमी झाली आहे. तर याचा परिणाम बाजार समितीच्या सेसवर झाल्याने बाजार समितीला सुमारे दीड कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा फटका बसला आहे.
गूळ खरेदी-विक्रीचे बदलेले समीकरण -
सांगलीच्या बाजार समितीमध्ये कर्नाटक राज्यातील रायबाग, गोकाक, अथणी, हारुगिरी आदी भागातून गुळाची मोठ्या प्रमाणात आवक होते. थेट गुऱ्हाळ घरातून हा गूळ घेऊन सौद्यातून सांगलीतील व्यापारी गुजरात, आंध्रप्रदेश आणि राजस्थान येथील व्यापाऱ्यांना गूळ पोहोचवतात. मात्र, आता व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधून गूळ खरेदी करण्याऐवजी थेट गुऱ्हाळ घरातून गुळाची खरेदी करणे पसंत केले आहे. कारण बाजार समितीमधील खरेदीपेक्षा ४०० ते ५०० रुपये क्विंटल कमी मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून लावण्यात येणारे ३ टक्के कमिशन आणि जास्तीची हमाली या कारणांमुळे इतर राज्यातील व्यापाऱ्यांनी हळदीचेही थेट शेतातून खरेदी करणे पसंद केले आहे.
सांगलीची हळद आज जगप्रसिद्ध मानली जाते. सांगलीच्या बाजार समितीत मिळणारे हळदीचे दर देशभर ग्राह्य मानले जातात. तर येथे मिळणाऱ्या हळदीला योग्य दरामुळे सांगली मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा या ठिकाणाहून हळदी घेऊन शेतकरी येतात. त्यामुळे सांगलीला हळदीसाठीचे जागतिक बाजारपेठ मानली जाते.
सांगलीत निघणाऱ्या सौद्यातून देशातील हळदीचे दर ठरतात. या वर्षी देशात हळदीच्या लागवडीत वाढ झाली असली तरी रोगाचा प्रादुर्भाव आणि पाण्याची कमतरता यामुळे हळदीच्या उताऱ्यात घट झाली. त्यातच गेल्या चार ते पाच वर्षांपासून हळदीला प्रति क्विंटलला ९ हजार ते ९ हजार ५०० रुपये असा दर मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून व्यापाऱयांना बजावण्यात आलेल्या सेवाकर नोटीसा यामुळे व्यापाऱ्यांनी अनेकवेळा केलेले व्यापार बंद आंदोलनामुळे व इतर कारणांमुळे काही व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून हळद खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिमाण सांगली बाजारपेठेतील हळदीच्या आवकवर झाला आहे. २०१७-१८ मध्ये हळदीची आवक १५ लाख क्विंटल होती. मात्र, यंदाच्या २०१८-१९ वर्षी ११ लाख ५५ हजार क्विंटल आवक झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ३ लाख ४८ हजार क्विंटलने हळदीची आवक घटली आहे.
सांगली बाजारपेठेतील खरेदीवरील कमिशन, हमाली, बाजार समितीचा सेस हा गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदाच्या वर्षी वाढला आहे. त्यातच व्यापाऱ्यांना सरकारने बजावलेल्या सेवाकर नोटीसा अशा अनेक कारणांच्या पार्श्वभूमीवर आज सांगलीची शेतीमालाची बाजारपेठ संकटात सापडली आहे. स्थानिक व्यापारी, हमाल आणि बाजार समितीने यावर बसून तोडगा काढला नाही तर सांगलीची बाजारपेठ उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.