सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आता हळद आणि बेदाणा सौदे हॉल उभारण्यात येणार आहेत. १६ एकर जागेत ६० कोटींची सुसज्ज अशी अद्यावत बाजार पेठ निर्माण करण्यात येणार आहे. लवकरच पणन विभागाकडून याला मंजूरी मिळेल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.
जागतिक हळदीची बाजारपेठ आणि बेदाणा विक्रीची विश्वसनीय बाजारपेठ म्हणूनही सांगली बाजारपेठ ओळखली जाते. मात्र, सांगली मार्केट यार्ड याठिकाणी आता हळद आणि बेदाणा सौद्यांसाठी जागा कमी पडत आहे. तसेच सुविधांचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यातच आता सर्वत्र ऑनलाईन सौद्यांना सुरूवात झालेली आहे. मात्र, पुरेशी सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाही. या पार्श्वभूमीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने आता हळद आणि बेदाणे ई-नाम सौद्यांसाठी अद्यावत बाजारपेठ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली नजिकच्या कुपवाड येथील सावळी-कानडवाडी याठिकाणी हळद आणि बेदाणा सौद्यांचे हॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी बाजार समितीकडून १६ एकर जागा विकत घेण्यात आलेली आहे. याठिकाणी ऑनलाईन सौदे व सर्व सोयीने युक्त सुसज्ज बाजारपेठेची निर्मिती होणार आहे. यामध्ये ५० हजार चौरस फुटाचे हळद सौदे हॉल, ३० हजार चौरस फुटाचे बेदाणा सौदे हॉल, तीस हजार चौरस फुटाचे तीन गोदाम तसेच ११५ व्यापारी गाळे अशी ६० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी याबद्दल माहिती दिली. याठिकाणी बांधकाम करण्यासाठी पणन विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला असून लवकरच त्याला मंजूरी मिळेल, असेही सभापती पाटील यांनी सांगितले.