सांगली - जत तालुक्यातील डफळापूर जवळील एका चेकपोस्टवर पोलिसांसोबत मदतीस म्हणून असलेल्या एका शिक्षकाला ट्रकने चिरडल्याने दुर्दैवी अंत झाला आहे. चेकपोस्टवरून पळालेला भरधाव ट्रक चालकाने अंगावर घातल्याने सदर शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. नानासाहेब(पिंटू) सदाशिव कोरे (36 रा.डफळापूर. शिक्षक- शाळा कोळी वस्ती,डफळापूर) असे मृत पावलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तसेच या अपघातात संजय बसगौंडा चौगुले (30) हे थोडक्यात बचावले आहेत.
हेही वाचा... राज्यातील सर्वात मोठे 'कोविड केअर सेंटर'; पाच हजार रुग्णांच्या उपचाराची आहे सोय..
पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालक हणमंत रामचंद्र मुरड (37 रा.नाथाचीवाडी ता.दौंड जि.पुणे) याला ताब्यात घेतला असून ट्रक क्रमांक एम एच 12 एल डी 9749 जप्त करण्यात आला आहे. घटनेनंतर आमदार विक्रमसिंह सावंत, अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबूले, पोलीस उप अधिक्षक दिलीप जगदाळे, पोलीस निरिक्षक राजाराम शेळके हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेचा आढावा घेतला.
शिंगणापूर जवळील आंतराष्ट्रीय चेकपोस्ट नाक्यावर शिक्षक नानासाहेब कोरे हे नियंत्रण कर्मचारी म्हणून सोमवारी ड्युटीवर होते. त्यावेळी सिमेंट भरलेला एक ट्रक अथनीकहून (कर्नाटक) जतकडे जात होता. या ट्रक चालकाला शिक्षक नानासाहेब कोरे यांनी थांबण्याचा इशारा केला. त्यानंतर ट्रक चालकाने ट्रक न थांबवता कोरे यांना शिवीगाळ केली आणि तेथून निघुन गेला. त्यास थांबवण्यासाठी कोरे यांनी ट्रकचा डफळापूरपर्यंत पाठलाग केला. तसेच त्यावेळी त्यांनी स्वतःची गाडी ट्रकच्या पुढे आणत ट्रक थांबवायला सांगितले. मात्र, ट्रक चालकाने ट्रक न थांबवता शिक्षक कोरे यांना ट्रकने उडवून दिले.