सांगली - कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसकडून सांगलीमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ट्रॅक्टर रॅली होणार आहे. रॅलीची सुरुवात येथील बसस्थानकापासून होत आहे.
विश्रामबाग येथील नेमिनाथ ग्राउंडवर ट्रॅक्टर रॅलीचा समारोप होणार आहे. ट्रॅक्टर रॅलीमध्ये 700हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झालेले आहेत. संपूर्ण शहरातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारचा कृषी कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संपूर्ण देशभर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात देखील ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून या कायद्याला विरोध करण्यात येत आहे.
कोल्हापूर आणि अमरावतीतही आंदोलन
राज्यात कोल्हापूर आणि अमरावतीत काल ट्रॅक्टर रॅली पार पडली. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्तवात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम उपस्थित होते. तर जवळपास 500हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. तसेच अमरावतीत देखील ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.