सांगली - मिरजेतील कोरोना रुग्णालयात काम करणाऱ्या चौघा डॉक्टरांना घर रिकामे करण्याची धमकी देण्यात आली आहे. सांगलीतील एका अपार्टमेंटमधील राहणाऱ्या कोरोना योद्ध्यांना तसेच अन्य रहिवाशांनी फ्लॅट सोडून जाण्यासाठी धमकावले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरांमुळे कोरोनाचा संसर्ग होईल ही भीतीनेे रहिवाशांनी घर सोडण्यास सांगितले आहे.
सांगली जिल्हा परिषदने 20 दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांसाठी वैद्यकीय अधिकारी भरती केल्या आहेत. जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने या भरती केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक जण भरती झाले आहेत. हे वैद्यकीय अधिकारी कोरोना युद्धात सहभागी होऊन सेवेत दाखल झाले आहेत. यापैकी सांगली जिल्ह्यातील दोघे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चार डॉक्टरांनी मिळून सांगली शहरातील प्रगती कॉलनी येथील।एका अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. तर या चौघांची ड्यूटी हे मिरजेच्या कोरोना रुग्णालयात लागली आहे.
सध्या सांगली जिल्ह्यात आणि विशेषतः सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर सांगली, मिरज शहरात अनेक डॉक्टर, नर्स यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सांगलीकर जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीतून कोरोनाविरोधात काम करणाऱ्या चार डॉक्टरांना सांगली शहरातील प्रगती कॉलनी येथील नागरिकांनी घर सोडून जाण्याची धमकी दिली आहे. डॉक्टरांमुळे संसर्ग होईल, या भीतीमुळे इतर फ्लॅट धारकांनी त्या चौघा डॉक्टरांना फ्लॅट त्वरित खाली करावा, असे सांगितले आहे.
याबाबत या डॉक्टरांनी सांगलीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना पत्र लिहून माहिती दिली आहे. तसेच संरक्षण देण्याची विनंती केली आहे.