सांगली - जिल्ह्यात आलेल्या महापूराची सावट यंदाच्या गणपती पंचायतनच्या शाही गणेशोत्सवावर पडली आहे. अगदी साध्या पद्धतीने आज गणपती पंचायतनच्या गणरायाचे आगमन झाले. महापुराच्या पार्श्वभूमीवर शाही मिरवणूक आणि इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसेच खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी जाहीर केला आहे. आज (सोमवारी) सकाळी भक्तिमय वातावरणात गणेशाचे आगमन गणपती संस्थानच्या दरबार हॉलमध्ये झाले आहे. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन व राजलक्ष्मीदेवी पटवर्धन यांच्या हस्ते यावेळी गणेशाची प्राणप्रतिष्ठा आणि आरती पार पडली.
हेही वाचा - राजकारणात प्रवेश केल्यास प्रश्न विचारायचे स्वातंत्र्य गमावून बसेन - नाना पाटेकर
गणरायाची आराध्य नगरी म्हणून सांगलीची ओळख आहे. आणि याठिकाणी सांगलीचे संस्थानिक पटवर्धन संस्थांतर्फे गणेश उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मात्र, या गणपती उत्सवावर महापुराचे सावट आहे आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर येथील गणपती संस्थानने आपला पाच दिवसांचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थानचे संस्थानिक श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी याबाबतची घोषणा केली. सांगलीचा मानाचा आणि सरकारी गणपती म्हणून सांगली संस्थानाच्या उत्सवाकडे पाहिले जाते.
हेही वाचा - सांगलीचा 'हा' बाप्पा चार दिवस आधीच येतो भक्तांच्या भेटीला
प्रतिवर्षी संस्थानातर्फे गणपतीचे आगमन आणि विसर्जन हे अत्यंत शाही पद्धतीने केले जाते. मात्र, यंदा महापुरामुळे जनतेचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा आणि या पाच दिवसातील सर्व कार्यक्रम आणि शाही मिरवणुका रद्द करून या खर्चाची रक्कम पुरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर सांगलीच्या गणपती मंदिरावर होणारी ऐतिहासिक लायटिंग तसेच सजावटही न करण्याचा निर्णय संस्थानिक पटवर्धन यांनी घेतला आहे.