सांगली - शिराळा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. कालपासून चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून आहे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ३४ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात सध्या १२.५७ टीएमसी इतका साठा निर्माण झाला आहे. सध्या धरणातून १ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावत आहे. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळपर्यंत चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात २७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून या परिसरात ३७२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. परिणामी चांदोली धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे धरणातून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाच्या पायथा गेटमधून सध्या १ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीत सुरू आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात बहुतांशी ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील 5 दिवस राज्यात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 18 तारखेपर्यंत सर्वदूर 75 ते 100 टक्केपर्यंत पाऊस पडेल. याच काळात काही ठिकाणी 64.5 मिलिमीटर ते 115.5 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.