सांगली - महाविकास आघाडीचे सरकार वसुली मानसिकतेचे आहे, त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी या सरकारचे हात थरथर कापत असल्याची टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच राज्यातील काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाल्याने, ते सोनिया गांधींचे देखील ऐकत नसल्याचा निशाणा यावेळी पडळकरांनी काँग्रेसवर साधला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
यावेळी राज्यातील मोफत लसीकरण आणि लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेली मदत आद्यप मिळाली नसल्याचा आरोप करत, भाजपाचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
आमदार पडळकर म्हणाले की, हे सरकार वसुलीच्या मानसिकतेत असलेले सरकार असून, लोकांच्या हितासाठी निर्णय घेताना किंवा पैसे खर्च करताना या सरकारचे हात थरथर कापतात. कोरोनातून बाहेर पडण्यासाठी लसीकरणाची मोहीम जास्तीत जास्त राबवणे हा एकमेव पर्याय असताना लसीकरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार ठामपणे कुठली भूमिका घेत नाही. मोफत लसीकरणावरून मंत्रीमंडळामध्ये तू-तु-मै-मै चालू आहे. दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी आग्रही आहेत की महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारने मोफत लसीकरण केले पाहिजे, परंतु राज्यातील काँग्रेसचे मंत्री सत्तेसाठी दोन्ही पक्षांच्या पुढे नांग्या टाकून बसले आहेत. त्यांचं राज्य सरकार पुढे काहीही चालत नाही, अशी परिस्थिती राज्यांमध्ये दिसत आहे.
लसीकरणाबाबत सरकार गंभीर नाही
केंद्र सरकारने लस खरेदी करण्यासाठी राज्याला परवानगी दिली आहे. परंतु लसीकरणावर खर्च करण्याची राज्य सरकारची मानसीकता नाही. हे सर्व जण वसुलीमध्ये व्यस्त आहेत. त्यांना जनतेशी काही देणे -घेणे नाही. सरकार लसीकरणाबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
कामगारांना एकही दमडी मिळाली नाही
पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी असंघटीत क्षेत्रातील जे नोंदणीकृत कामगार आहेत, त्यांना कडक निर्बंध लावताना मदतीची घोषणा केली होती. मात्र आतापर्यंत एकाही कामगाराला मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्री केवळ घोषणाच करत आहेत, आणि वरून केंद्रावर टीका करत आहेत.
हेही वाचा - 'निवडणूक आयोगच्या अध्यक्षांना केंद्र सरकारने राज्यपालपद बहाल केल्याची चर्चा'