सांगली - कोरोनाच्या भीतीने ऊस तोड कामगार आपापल्या गावी निघून गेले आहेत. यामुळे पन्नास वर्षात पहिल्यांदाच वाळवा तालुक्यातील साखराळे येथील राजाराम बापू साखर कारखान्याचा ४० ते ५० टन ऊस शिल्लक आहे. यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे कारखान्यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
एप्रिल आणि मेमध्ये कारखाने बंद होऊन शेतीमध्ये खुरपणीची कामे सुरु असतात मात्र, यावेळेस कोरोनामुळे कामगार मिळत नसल्याने अद्यापही कारखाना सुरू आहे. जयंत पाटील यांनी दाखवलेल्या विश्वासापोटी कोल्हापूर येथील दत्त कारखाना बंद झाल्यावर तेथील कामगारांकडूनसध्या ऊस तोडणी सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे कारखान्यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे चेरमन पी. आर. पाटील यांनी सांगितले. ते कुरळप येथील वारणा महालक्ष्मी पाणी पुरवठा संस्थेच्यावतीने सभासदांना मास्कचे वाटप कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले, चीनमध्ये कायद्याचे काटेकोर पालन केले जाते. तिथे मीडिया किंवा इत्तर दैनिक नाहीत. फक्त एकच दैनिक आहे, तेही चीन सरकार चालवते. त्यांनी दिलेल्या बातम्याच त्यात छापल्या जातात. चीनमध्ये पती पत्नी एक मूल राहण्याची सक्ती आहे. अशा शिस्तबद्ध देशात कायद्याचा अवमान कोणी ही करत नाहीत. यासारख्या देशामध्ये पहिल्यांदा कोरोनाचा प्रसार झाला आणि आपल्या देशातील काही लोक परदेशातून आल्याने भारतावर ही सध्या कोरोनाचे मोठे संकट उभारले आहे आणि हे रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. पोलीस बांधव ही अहोरात्र झटत आहेत. वारणा व हनुमान पाणी पुरवठा संस्था मास्कचे वाटप करून त्यांची उत्तमरित्या काम केले असून गावातील सोसायटीच्या वतीने ही सभासदांना मास्क वाटून त्यांना कोरोनाविषयी जनजागृती करण्याचा सल्लाही पी. आर. पाटील यांनी दिला.
जिल्हा बंद गावाच्या सीमा बंद करून एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, म्हणून लॉकडाऊनसारखे उपायही चालू आहेत. याही पुढे जाऊन दोन दिवसापासून मास्कची सक्ती केली असून विना मास्क रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे नोंद करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना व शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसभर बाहेर फिरावे लागते. त्यांनाही मास्क असावा, म्हणून कुरळप येथील वारणा महालक्ष्मी पाणीपुरवठा संस्था व हनुमान पाणीपुरवठा यांनी सर्व सभासद व कर्मचाऱ्याना पी. आर. पाटील कुरळप, सह-पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करत मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच शोभा पंडित पाटील, उपसरपंच संजय गायकवाड, गणेश सूर्यवंशी, पंडित पाटील वारणा महालक्ष्मी पाणी पुरवठा चेअरमन अशोक देवकर, शिवाजी सूर्यवंशी संपत देवकर उपस्थित होते.