सांगली - सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत, या निवडणुकीत सांगलीच्या कवठे पिरान ग्रामपंचायतीचा कारभार चक्क नवरा-बायकोच्या ताब्यात गेला आहे. घराचा कारभार पाहणारी पत्नी गावची सरपंच तर पतीदेव उपसरपंच झाले आहेत. ग्रामपंचायतीने बिनविरोध म्हणून भीमराव माने व अनिता माने या पती-पत्नीला बिनविरोध निवडून दिले आहे.
सांगली जिल्ह्यातील सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुका मंगळवारी पार पडल्या. या निवडणुकीमध्ये कुणी सरपंच, कुणी उपसरपंच पदावर विराजमान झाले आहे. कुठे महिला आरक्षण, कुठे पुरुष आरक्षण. त्यामुळे कहीं खुशी-कहीं गम, अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. ग्रामपंचायतीमध्ये पती-पत्नी कारभारी बनले आहेत. भीमराव माने आणि त्यांच्या पत्नी अनिता माने या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
पै. हिंदकेसरी माने यांचे गाव
मिरज तालुक्यातील कवठे पिरान हे गाव हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांचे गाव म्हणून ओळखले जाते. याठिकाणी माने कुटुंबीयांचे गेल्या 50 वर्षांपासून कवठे पिरानवर वर्चस्व आहे. हिंदकेसरी मारुती माने यांचे पुतणे म्हणून ओळख असणारे भीमराव माने हे गेल्या 25 वर्षांपासून गावाचे नेतृत्व करतात. आदर्श सरपंच म्हणूनही भीमराव माने यांचा गौरव झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त अभियान, निर्मल ग्राम, व्यसनमुक्ती अभियान यामध्ये विजेतेपद पटकावले आहे. तर भीमराव माने यांनी सांगली जिल्हा परिषदेचे सदस्यपदही भूषवले आहे.
माने गटाचा दणदणीत विजय
यंदा पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भीमराव माने यांच्या गटाने 17 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीमध्ये भीमराव माने व त्यांच्या पत्नी अनिता मानेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि दोघा पती-पत्नीचाही विजय झाला. या निवडणुकीनंतर ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण हे महिला खुल्या गटासाठी राखीव झाले. निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी सरपंचपदाच्या उमेदवार म्हणून अनिता माने तर उपसरपंचदाचे उमेदवार भीमराव माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मंगळवारी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका पार पडल्या आणि यात अनिता माने यांची सरपंचपदी आणि भीमराव माने यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर गावाने एकच जल्लोष केला आहे.
जोडीने साधणार गावाचा विकास
या निवडीनंतर उपसरपंच भीमराव माने म्हणाले, पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायतीचा कारभार आपण पाहत आहोत. कोट्यवधी रुपयांचा निधी गावाच्या विकासासाठी आजपर्यंत आणला आहे. 2005मध्ये गावात संपूर्ण महिलांचे पॅनेल ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आणले होते आणि महिलांना नेतृत्व करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने आपण आपल्या पत्नीला यंदाच्या निवडणुकीमध्ये उभे केले होते. आता ती सरपंच म्हणूनसुद्धा निवडून आलेली आहे. आजपर्यंत पत्नी म्हणून घरचा कारभार उत्तमरित्या सांभाळते आहे. त्यामुळे गावाचा कारभारसुद्धा चांगला करेल, अशी अपेक्षा आहे. आणि काही दिवस या कारभारात आपली प्रत्यक्ष मदत व्हावी, म्हणून आपण उपसरपंचपद स्वीकारले आहे, आता आम्ही मिळून या गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास भीमराव माने यांनी व्यक्त केला आहे.
घर सांभाळले, आता गावपण सांभाळू
सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर अनिता माने म्हणाल्या, की आजपर्यंत आपण घर उत्तम सांभाळले आहे. आता आपली मुलेसुद्धा मोठी झाली आहेत. आपल्या घरात समाजकारण, राजकारण या दोन्ही गोष्टी आजपर्यंत सुरू आहेत. महिलांच्या प्रति काम करायची असणारी इच्छा व गावच्या विकासासाठी आणि महिलांना सक्षमीकरणासाठी आपण निवडणूक लढवली. आता सरपंचपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली गेलेली आहे. ती नक्कीच पतीच्या मदतीने सार्थ करू, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील पहिलेची जोडी
या गावचे ग्रामस्थ आणि माजी ग्रामपंचायत सदस्य असणारे पाटील म्हणाले, की अशापद्धतीने सरपंच आणि उपसरपंचपदी पती-पत्नी बिनविरोध होण्याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे.
पती-पत्नी करणार गावचा कारभार
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिला जरी विराजमान असल्या तरी अनधिकृतपणे तो कारभार पतीदेव करतात, त्यामुळे गावात अनेक वेळा तंटे निर्माण होतात. मात्र कवठे पिरान गावात ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी मिळून भीमराव माने आणि त्यांच्या पत्नी अनिता माने यांना सरपंच आणि उपसरपंच पदावर विराजमान केले आहे.