सांगली - मगरीच्या हल्ल्यात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सांगलीच्या मौजे डिग्रज येथे कृष्णा नदीतील मगरीने नदीकाठावरून आकाश जाधव या मुलाला ओढून नेले होते. यानंतर कृष्णा नदीत वन विभाग आणि ग्रामस्थांकडून शोध मोहीम राबवण्यात आली होती. अखेर आज (शुक्रवार) दुपारी तुंग नजीक आकाशचा मृतदेह सापडला.
सांगलीच्या मौजे डिग्रज येथील वीटभट्टी मजूर कुटुंबातील आकाश जाधव (वय. १२) या शाळकरी मुलाला गुरुवारी दुपारच्या सुमारास कृष्णा नदीतील मगरीने ओढून नेल्याची घटना घडली होती. आईच्या देखत मुलाला मगरीने ओढून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर एकाच खळबळ उडाली होती. यानंतर वनविभागासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जीवरक्षक टीम व ग्रामस्थांच्या मदतीने कृष्णा नदी पात्रात शोध मोहीम सुरू केली होती.
गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत आकाशचा शोध घेण्यात आला होता. मात्र, शोध लागला नाही. शोध घेतेवेळी मगरीचेही दर्शन झाले होते. यानंतर आज सकाळपासून पुन्हा कृष्णा नदी पात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली व दुपारच्या सुमारास पथकाला तुंग नजीकच्या नदीपात्रात आकाशचा मृतदेह सापडला आहे.