सांगली - मासेमारीसाठी गेलेल्या तिघा भावंडांचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सांगली तालुक्यातील घानंद या ठिकाणी घडली होती. रविवारी एक चुलत आणि दोघे सख्खे भाऊ वाहून गेल्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. सोमवारी सकाळी या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. एकाच कुटुंबातील तिघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
दुपारपासूनच गायब होते तिघे भावंड
आटपाडी तालुक्यातील घाणंद तलावाच्या बंधाऱ्यात एकाच कुटुंबातील तिघे भावंड वाहून गेल्याची घटना रविवारी घडली होती. ज्यामध्ये अंकुश व्हनमाने (वय, १६), आनंद अंकुश व्हनमाने (वय, १५) हे सख्खे भाऊ आणि त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू व्हनमाने (वय, १७) हे तिघे वाहून गेले होते. रविवार दुपारपासून ही तिघे भावंडे बेपत्ता झाले होते. सायंकाळी बराच शोध घेतला असता, गावातील घाणंद तलावाच्या सांडव्यालगत दोन मुलांचे कपडे आणि चपला आढळून आले. त्यानंतर हे तिघे पाण्यातून वाहून गेल्याची बाब लक्षात आल्याने तिघा मुलांचा शोध सुरू करण्यात आला होता. संपूर्ण रात्रभर याठिकाणी शोध मोहीम सुरू होती. मात्र अंधार आणि पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने शोध कार्यात अडथळा येत होता.
हेही वाचा- पोटावर गरम चटके दिलेल्या मेळघाटातील 'त्या' बालकाचा अखेर मृत्यू
मृत्यूनंतरही सख्ख्या भावांची मिठी सुटली नाही-
सोमवारी सकाळनंतर पुन्हा भावंडांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. काही वेळातच चुलत भावाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर अंकुश आणि आनंदा या दोघा भावांचा हे मृतदेह सापडला. एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत दोघा सख्या भावंडांचा मृतदेह आढळून आला आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे घानंद गावावर शोककळा पसरली असून, आटपाडी तालुक्यात एकाच कुटुंबातील तिघा भावंडांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा- Magnet Man नाशिकच्या या व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू, लस घेतल्यानंतर सुरू झाला प्रकार