सांगली - शेतीपूरक वस्तू आणि अन्य साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांना शासनाने तत्काळ सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे शेतीशी निगडित उत्पादन आणि विक्रीवर बंदी आणल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शासनाने तत्काळ यासंबंधी निर्णय घेण्याची विनंती शेतकरी संघटनेकडून होत आहे.
शेती उत्पादन आणि शेती क्षेत्राशी संबंधित असणारी सर्व दुकाने सध्या बंद आहेत. त्यामुळे पीक काढणीपासून नवीन पिके घेण्यासाठी येणाऱ्या अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ठिबक सिंचन, मलचींग पेपर,आणि प्लास्टिक पाइप, आदी अनेक प्रकारचे साहित्य लॉकडाऊन काळात उपलब्ध नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. या साहित्याची विक्री तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरची गरज आहे. मात्र, दुकाने बंद असल्याने अडचणी वाढल्या आहेत. यामुळे लवकरात लवकर या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी शेतकरी कमगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.