सांगली - 2019 पेक्षा 2021 चा महापूर मोठ्या प्रमाणात असून ही तुटपुंजी मदत घोषित करून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ज्या मदतीमुळे शेतातील घाण ही निघू शकत नाही, असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. ते इस्लामपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. उसाला प्रतिगुंठा 130 रुपये व सोयाबीन सारख्या पिकाला 68 रुपये प्रतिगुंठा मदत जाहीर केल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी सर्व विरोधी पक्षाच्या वतीने आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. येत्या २४ ऑगस्ट रोजी हा मोर्चा निघणार आहे.
सरकार वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. शेतकऱ्यांना गंडवले जात आहे. आघाडी सरकारकडून फसवणूक होत आहे. अति तातडीची मदत मिळायला महिना लागत आहे. अजून मदतीचा पत्ता नाही. पंचनामे चालू आहेत. मी यापूर्वी चार महापूर अनुभवले. तीन वेळा तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात आले. महापुरानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कोल्हापुरात येत पूरस्थितीची पाहणी केली आणि फक्त आश्वासन देऊन गेले. मदत कधी मिळणार? असा सवालही यावेळी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते शमशुद्दीन संदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे, स्वाभिमानी पक्षाचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा, वाळवा तालुका अध्यक्ष जगन्नाथ भोसले, रमेश पाटील, विक्रांत कबुरे यांचे सह वंचित आघाडीचे नेते शाकीर तांबोळी, नेते विजय पवार, मनसेचे सनी खराडे, सतिश पवार, रासपाचे धनाजी गावडे, आरपीआयचे आप्पासाहेब कांबळे, शेतकरी संघटनेचे नेते आप्पासाहेब पाटील आदिसह उपस्थित होते.
हेही वाचा - नागपुरातील गंगा-जमुना वस्तीत तणाव, आंदोलक-विरोधकांमध्ये धक्काबुक्की