सांगली Swabhimani Protested : ऊस दरवाढ देताना कोल्हापूर पॅटर्ननुसार द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेली आहे. या मागणीसाठी गेल्या एक महिन्यांपासून सांगली जिल्ह्यामध्ये ऊस दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहे. (Vasantdada Factory) 1 डिसेंबरला राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर इथल्या राजारामबापू साखर कारखान्यासमोर काटाबंद आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी स्वाभिमानीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उड्या मारल्या होत्या. या ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून आठवड्याभरामध्ये ऊस दर प्रश्नी कारखानदारांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं; मात्र बैठक झाली नसल्यानं 10 डिसेंबरला वसंतदादा कारखान्यासमोर आंदोलन करण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली होती.
कार्यकर्त्यांचे काटाबंद आंदोलन : रविवारी सकाळी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्यासमोर काटा बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. यावेळी आक्रमक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गेटवर धडक देऊन गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना रोखून धरलं. त्यामुळे या ठिकाणी पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटीचा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना मागे हटवले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या गेट समोरच ठिय्या मारत आंदोलन सुरू केलं. त्यामुळे आंदोलनामुळे कारखान्याचे गाळप ठप्प झाले. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : ऊस दरवाढ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यानंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गेटकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी गेटवर चढून गेट तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मागं रेटण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. पोलिसांच्याकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या गेट समोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचं व शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. तर ऊस दराबाबतचा निर्णय कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे जाहीर होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केली आहे.
हेही वाचा: