सांगली- पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. याला सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींचीही मोठी मदत मिळत आहे. त्यामुळे पूरग्रस्त लवकर पुन्हा उभारतील,असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला आहे. मिरजेत पालघरच्या झडपोली येथील जिजाऊ संस्थेच्या वतीने आयोजित मदत वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज अनेक सामाजिक संस्था धावून येत आहेत. पालघर जिल्ह्यातील झडपोली येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थाही सांगलीच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आली आहे. संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना अनेक पातळ्यांवर मदत देऊ करण्यात येत आहे. विशेषतः पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येत आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आरोग्य तपासणी करुन औषध वाटप करण्यात येत आहे. पुढील दहा दिवस या संस्थेकडून पूरग्रस्त दोन्ही जिल्ह्यात सुमारे दोन लाख वह्यांचे आणि 2 हजार ब्लॅंकेटचे वाटप करण्याचे काम चालणार आहे. आज मिरजेत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना या संस्थेकडून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते वह्या आणि ब्लँकेट्स वाटप करण्यात आले. याप्रसंगी सांगलीच्या महापौर संगीता खोत, जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी, आज सांगली जिल्हा मोठ्या संकटात सापडला आहे आणि राज्यातील अनेक सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येतात. सरकार ही सर्व पातळ्यांवर पूरग्रस्तांना मदत करण्यामध्ये प्रयत्नशील आहे. सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींचा पूरग्रस्तांना मिळणारा हा मदतीचा हात मोठा असून त्यामुळे पूरग्रस्त आज पुन्हा उभा राहत आहे, असा विश्वास खाडे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारही पूरग्रस्तांना जी काही मदत लागेल, ती करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मंत्री खाडे यांनी दिली आहे.