सांगली - सासरच्या छळास कंटाळून एक महिन्यापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना आष्टा (ता. वाळवा) येथे घडली आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी घात-पाताचा संशय व्यक्त केला आहे.
मृत विवाहितेच्या वडिलांनी मुलीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची फिर्याद आष्टा पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी पती, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. मुलीच्या नातेवाईकांनी आत्महत्या नसून घात-पात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
अनुजा अवधुत माळी (वय२३) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव असून तिचे वडील सुकुमार दत्तात्रय पाटील (रा. कांडगाव, ता.करवीर,जि.कोल्हापूर) यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पती अवधुत संजय माळी, सासरा संजय बापूसो माळी, सासू वंदना संजय माळी (सर्व राहणार दुधगाव रोड आष्टा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान घातपाताचा संशय व्यक्त केल्याने आष्टा ग्रामीण रुग्णालयात अनुजाच्या मृतदेहाचे तहसीलदारांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सासरच्या आणि माहेरच्या लोकांत किरकोळ वादावादी झाली. ग्रामीण रुग्णालयात आष्टा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिपक जाधव अधिक तपास करीत आहेत.