सांगली- जत तालुक्यातील मल्लाळ येथील विद्यार्थ्याने ऑनलाइन शिक्षणासाठी शेतकरी वडिलांकडून वेळेत मोबाईल मिळत नसल्याने राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली. आदर्श आप्पासाहेब हराळे (वय १५, रा. मल्लाळ, ता. जत) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलीस ठाण्यात आप्पासाहेब मारूती हराळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, आदर्श हराळे नुकताच इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. जत शहरातील जत हायस्कूल येथे तो शिक्षण घेत होता. तो आता दहावीमध्ये प्रवेश घेणार होता. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद असल्याने शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे जत तालुक्यातील अनेक शाळा मोबाईलवरुन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.
दरम्यान,आदर्श हराळे त्याच्या शेतकरी वडिलांकडे शिक्षणासाठी मोबाइलची मागणी करत होता. घरची आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याने तत्काळ मोबाईल घेणे शक्य नाही, असे सांगत वडील आप्पासाहेब हराळे आदर्शची समजूत घालत होते. मात्र, सोमवारी आदर्श यांने पुन्हा वडिलांकडे मोबाईलची मागणी केली. वडिलांनी लवकरच घेऊ, असे सांगताच आदर्श नाराज झाला. याच नैराश्यातून आदर्शने घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आदर्शच्या पश्चात आई वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी बी. डी. भोर तपास करत आहेत.