सांगली - मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनसाठी काम बंद आंदोलन केले आहे. कंत्राटी असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून संबंधित कंपनीकडून वेतन देण्यात आले नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांचा निधीही भरण्यात आला नसल्याने संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन करण्यात आले.
वेतनही नाही, निधीही नाही
मिरज शासकीय रुग्णालयातील साफसफाईचा ठेका हा सूर्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहे. या कंपनीकडील 60 ते 70 सफाई कर्मचारी शासकीय रुग्णालयात कार्यरत आहेत. मात्र कंपनीकडून या कर्मचाऱ्यांचा गेल्या 10 महिन्यापासून भविष्य निर्वाह निधी भरला गेला नाही. तसेच तीन महिन्यांच्या पगारही कंपनीकडून देण्यात आला नाही, असा आरोप करत रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आहे.
आंदोलन करत अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने
कामबंद आंदोलन करत अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन भेट घेऊन जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कामगार काम करणार नाहीत, असा इशारा देण्यात आला. सूर्या कंपनी कामगारांचा पगार देण्यास सक्षम नसल्याने ठेका रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.