सांगली - आम्ही पेटलेलो आहोत. सर्वांच्या मनात राग आहे. सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला झाला आहे. त्याचा मी निषेध व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तासगाव येथे वक्तव्य केले. तसेच वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबियांनी काळजी करू नका. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार आहे, असा धीर त्यांनी जवानांच्या कुटुंबियांना दिला. पाकिस्तान हा देश भिकारी झाला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. हा जुना भारत नाही, नवीन भारत देश आहे. या भ्याड हल्ल्याला आम्ही उत्तर देणार असे मुख्यमंत्री म्हणाले.
काल (गुरुवार) पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांचा आकडा ४५ वर पोहचला आहे. आज (शुक्रवारी) आणखी दोन जवानांना वीरमरण आले. ३८ जवानांवर काश्मीरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. जैशचा दहशतवादी २२ वर्षीय आदिल अहमद दार याने हा आत्मघातकी हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.
या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.