सांगली - प्रवासी वाहतूक करणारी एसटी आता मालवाहतूक सुद्धा करणार आहे. सांगली एसटी आगाराकडून उत्पन्न वाढीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यांतर्गत सध्या एसटीची बस सेवा सुरू झाली आहे. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एसटीने मालवाहतुकीचा मार्ग अवलंबला आहे.
लॉकडाऊननंतर एसटी सेवाही ठप्प झाली होती. आता ही एसटी हळूहळू सुरू होऊ लागली आहे. तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या स्थितीमुळे आजही एसटी सेवा बंद आहे. मात्र ऑरेंज झोनमध्ये गेल्याने सांगली जिल्ह्यामध्ये २२ मे पासून जिल्हा प्रशासनाकडून एसटीला जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली. त्यामुळे ठप्प असलेली एसटीची चाक पुन्हा सुरू झाली. सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत एसटी सेवा सुरू आहे. कोरोनाचे नियम सोशल डिस्टन्स पाळून या एसटी सेवेला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये केवळ २३ प्रवासीच एका एसटीतून प्रवासी वाहतूक करायला मान्यता आहे. तर प्रवासी तिकीट दर मात्र तोच आहे. २५ मे अखेर केवळ सहाशे फेऱ्या जिल्ह्यांतर्गत झाल्या आहेत. तीन हजार प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला आहे. त्यामुळे एसटीला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. परिणामी एसटी सेवा सुरू होऊनही सोशल डिस्टन्सच्या नियमामुळे तोट्यात चालत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून आता सांगलीच्या एसटीला मालवाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणारी एसटी आता माल वाहुन नेण्याचे काम करणार आहे. त्यासाठी एसटी आगाराकडून बंद असलेल्या एसटीमधील सीटस काढून टाकण्यात आलेले आहेत. जवळपास २५ एक बस या मालवाहतूक करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. औद्योगिक क्षेत्रासह भाजीपाला वाहतूक या एसटीमधून आता करता येणार आहे. त्यासाठी सांगलीच्या विभागीय नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी उद्योजक, विक्रेते यांना एसटीच्या या नव्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सांगली जिल्ह्यासह राज्याच्या कोणत्याही कानाकोपर्यात आता मालवाहतूक करण्यासाठी एसटी सेवा सज्ज झाली आहे. आणि तोट्यात चाललेल्या एसटी सेवेला, मला वाहतुकीच्या नव्या मार्गामुळे थोडाफार आर्थिक फायदा होईल, अशी अपेक्षा एसटी महामंडळाला आहे.