सांगली - यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाण्यांची मोठी गरज भासणार आहे. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांचे गट शेतीच्या माध्यमातून बियाणे उत्पादनाचा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग सांगलीच्या वाळवा तालुक्यात यशस्वी केला आहे. 170 शेतकऱ्यांनी एकत्र येत वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 100 एकरावर 400 क्विंटल उच्च दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांच्या पिकाचे उत्पादन घेतले आहे.
गट शेतीतून 400 क्विंटल बियाणांचे उत्पादन
संपूर्ण महाराष्ट्रात गतवर्षी अतिवृष्टी आणि बोगस बियाणे याचा शेतकऱ्यांना आणि पीक उत्पादनाला मोठा फटका बसला. याचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांची मोठी टंचाई भासणार आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून ग्रामबीजोत्पादन योजना राबविण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात सुमारे शंभर एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून 400 क्विंटल सोयाबीन बियाण्यांची क्षमता असणारा सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले आहे. तालुक्यातील 170 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्राकडून विकसित करण्यात आलेल्या सोयाबीनचे फुले संगम 726 या वाणाची लागवड करत उन्हाळी हंगामात यशस्वी सोयाबीन पीकाचे उत्पादन घेतले आहे.
जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग
वाळवा तालुक्यातील शेगाव या ठिकाणी बियाणे उत्पादनाचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. तर या ठिकाणी आलेल्या पिकातून उत्तम दर्जाच्या बियाण्यांची निर्मिती होण्यासाठी या सोयाबीन पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली. ड्रोन फवारणी आता शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे, कारण यामुळे कमीत कमी वेळेत व कमी खर्चात शेतकऱ्यांना औषध फवारणी शक्य असल्याचे यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कृषी अधिकाऱ्यासह शेतकरी उपस्थित होते.
सोडवला बियाणांचा प्रश्न
यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबीन पिकांची लागवड करताना बियाण्यांच्या टंचाईचा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र बियाणांचा भेडसावणारा प्रश्न, बाजारात उपलब्ध असणाऱ्या बियाणांबाबतची विश्वासार्हत या सर्वांना गटशेतीच्या माध्यमातून उत्पादित केलेले बियाणे हे उत्तम पर्याय ठरणार आहेत. तसेच उत्पादित केलेल्या बियाण्यांच्या विक्रीतूनही शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवता येणार आहे.