सांगली - जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाणी प्रश्नाच्या श्रेयवादावरुन भाजपाचे खासदार संजयकाका पाटील आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे. खासदार संजयकाका पाटील हे केवळ खोटं बोलण्याचा उद्योग करत आहेत, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर दुष्काळी गावांना पाणी देता येत नसेल, तर संजयकाका पाटलांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, असेही सेनेने म्हटले आहे.
जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निवडणूकीच्या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांनी, या ४२ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहे. यासाठी तरतुदही करण्यात आल्याची माहिती देत पाणी प्रश्न आपण सोडवणार असल्याची ग्वाही दिली होती. यावर शिवसेनेने खासदारांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जातीने या प्रश्नाकडे लक्ष घालून, हा पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता पाणी येण्याचे चित्र निर्माण झाले असताना, खासदार केवळ श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. संजयकाका पाटील यांचा हा उद्योग म्हणजे दुसऱ्याच्या पोराला आपले म्हणण्याचा प्रकार आहे, अशी टीका शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. भाजपने केवळ गाजर दाखवण्याचे काम केले आहे. खासदार संजयकाका पाटील यांना पाच वर्षात ४२ गावांचा प्रश्न का दिसला नाही, असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आला.
मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संजयकाका पाटील हे केवळ दुष्काळग्रस्तांची फसवणूक करत आहेत, असा आरोप विभूते यांनी केला आहे. तसेच खासदारांनी जर पाण्याचा प्रश्न सोडवल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, असे स्पष्ट करत पाणी प्रश्न सोडवता येत नसेल, तर खासदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, असे आवाहन यावेळी त्यांच्याकडून करण्यात आले.
तसेच तासगवमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत शिवसेनेने आंदोलनाचा पाठपुरावा केला.पण या १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुतळा अनावरणसाठी शिवसेनेच्या एकही पदाधिकारयास निमंत्रण देण्यात आले नाही. याठिकाणीही उद्घाटन करून खासदार संजयकाका पाटील हे केवळ श्रेया घेत आहेत, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केला. आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेकडून स्वतंत्र लढवण्याची जोरदार तयार सुरू आहे. आपण या लोकसभा निवडणुकीसीठी उमेदवारीची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली असून पक्षाने संधी दिल्यास लोकसभेच्या मैदानात आपण असणार, असे यावेळी संजय विभूते यांनी जाहीर केले.