सांगली - रांगोळीच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कलाविष्कार सांगलीमध्ये रचण्यात आला. तब्बल सव्वालाख स्क्वेअर फुटाची रांगोळी अवघ्या ७५ तासात रचून सांगलीच्या कलाशिक्षकांनी शिवरायांना अभिवादन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगासमोर अद्भूत कलाविष्कारातून यावा, हा उद्देश घेऊन प्रसिद्ध रांगोळीकर आदमअली मुजावर आणि त्यांच्या पथकाने शिवजयंतीनिमीत्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा रांगोळीतून साकारण्याचा निर्धार केला होता.
१६ फेब्रुवारीपासून या महारांगोळीला सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सुरुवात झाली होती. यासाठी जिल्ह्यातील तब्बल १०० कलाशिक्षक मैदानात उतरले होते. हा कलाविष्कार साकारण्याचा निश्चय करत अहोरात्र झटत अवघ्या ७५ तासात २५० बाय ५५० फुटाची ही विश्वविक्रमी रांगोळी पूर्ण करण्यात आली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल ३० टन रांगोळी आणि ५ टन विविध रंगाचा वापर करण्यात आला. यासाठी तब्बल ३० लाख खर्च आला आहे.
या विश्वविक्रमाची जगातील ९ रेकॉर्ड बुकमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. गिनीज, लिम्का, गुगल, एशिया अशा वर्ल्ड बुकमध्ये हा विक्रम नोंदविला जाणार आहे. यावेळी 'जय भवानी ,जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', या घोषणांनी स्टेडियम दुमदुमून गेले होते. एक इतिहास रचल्याची भावना आणि आनंद रांगोळी साकारणाऱ्या सर्व कलाशिक्षकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.