सांगली - वाढीव वीज बिल आणि वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले आहे. वीज वितरण कंपनीचा निषेध म्हणून वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढत शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मिरजेत शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी वीज वितरण कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. लॉकडाऊन सुरू असताना वीज ग्राहकांकडून 70 टक्के वीज बिल वसुलीसाठी सावकारी पद्धतीने काम सुरू आहे. वेळेवर बिल न भरल्यास नोटीस न बजावता वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जनता याआधीच आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीचा हा मनमानी कारभार सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करणारा आहे. असा आरोप मिरज शिवसेनेच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही
संतप्त शिवसैनिक कारभाराचा निषेध म्हणून मिरज मार्केट ते वीज महावितरण कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात शिवसैनिकांसह वीज ग्राहक सहभागी झाले होते.यावेळी वीज महा वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच वीज वितरणचा मनमानी कारभार थांबला नाही,तर कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,असा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
सरकारला घरचा आहेर
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, यामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत.सत्तेत शिवसेना असताना देखील सत्ताधारी सरकारच्या विरोधात शिवसैनिकांनी मिरजेत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या विरोधात मोर्चा काढत सरकारला घरचा आहेर दिला आहे.