सांगली : शिराळा न्यायालयाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना 2009 साली रेल्वे भरती प्रकरणी आंदोलन केल्यामुळे पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे. यामुळे राज ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनसेचे शिरीष पारकर यांना देखील बजावण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तारखेला हजर राहिले नसल्याने शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांना पुन्हा वॉरंट बजावले आहे.
काय आहे प्रकरण : राज्यामध्ये मनसेच्या वतीने 2009 साली रेल्वे भरती प्रकरणी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. तर मनसेचे नेते राज ठाकरे यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातल्या शेडगेवाडी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होता. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जबरदस्तीने दुकाने बंद करण्याबरोबर दगडफेकीचा प्रकार घडला होता.
14 वर्षांपासून सुनावणी सुरू : शिराळा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते शिरीष पारकर यांचा देखील समावेश होता. सदर गुन्ह्याचा खटला हा शिराळा न्यायालयामध्ये गेल्या 14 वर्षांपासून सुरू आहे.
अजामीनपात्र वॉरंट जारी : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सुनावणी दरम्यान वारंवार गैरहजर राहत आहेत. यामुळे चार महिन्यांपूर्वी शिराळा न्यायालयाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावण्यात आला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून त्यांच्या वकिलांनी शिराळा न्यायालयाचे वरिष्ठ न्यायालय असणाऱ्या इस्लामपूर न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली होती आणि अजामीनपात्र वॉरंट रद्द करून घेतला होता.
न्यायालयाने अर्ज केला नामंजूर : न्यायालयाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी हजर राहण्याची मुभा देण्यात आली होती. दरम्यान, राज ठाकरेंचे नाव सदर गुन्ह्याच्या दोषारोप पत्रातून वगळण्यात यावे यासाठी राज ठाकरेंच्या वकीलांकडून इस्लामपूर न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र शुक्रवारी तो अर्ज इस्लामपूर न्यायालयाकडून नामंजूर करण्यात आला.
राज ठाकरेंच्या वकिलांची मागणी : शनिवारी शिराळा न्यायालय मध्ये खटल्याची सुनावणी पार पडली असता, राज ठाकरे यांचे वकील रवी पाटील यांच्याकडून राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने आणि शिरीष पारकर बाहेरगावी असल्याने त्यांना गैरहजर राहण्यासाठी मुभा देण्यात यावी,असा अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने सदरचा अर्ज नामंजूर करत राज ठाकरे आणि शिराष पारकर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजवला आहे.
हेही वाचा : New Judges for SC: सर्वोच्च न्यायालयासाठी पाच नवीन न्यायाधीशांची नेमणूक..