सांगली - चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल विकता येत नाही, तर कित्येक शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतात कुजून गेला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे लागवडीसाठी सध्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र, शेतकऱ्यांची बँक म्हणून कार्यरत असणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाबाबत अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
दुसरीकडे, लोकप्रतिनिधी आणि कारखानदार यांना मात्र सोयीस्कर कर्जाचे वाटप करून वसुलीबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक सोयीसुविधेबाबत दुर्लक्ष केले जात आहे. शासन शेतकऱ्यांना विनातारण व तत्काळ कर्ज देण्यासाठी सांगत असताना ग्रामीण भागात मात्र सोसायटी व बॅंकेकडून कर्ज दिले जात नाही, असे जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील यांनी सांगितले. असा प्रकार रघुनाथदादाप्रणित शेतकरी संघटनेकडून खपवून घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज न दिल्यास बँकेला टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा हणमंत पाटील यांनी दिला आहे.