इस्लामपूर (सांगली) - अंगणात खेळणाऱ्या सात वर्षाच्या चिमुरड्या मुलीला तुझे पप्पा बोलावत आहेत, असे सांगून स्वतःच्या घरी नेत एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार इस्लामपुरात घडला आहे. अत्याचाराच्या या घटनेने इस्लामपूर शहर हादरले आहे. अल्पवयीन आरोपी मुलाची इस्लामपूर पोलिसांनी बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
इस्लामपूर शहराच्या पश्चिमेकडील उपनगरात राहणाऱ्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार झाल्याची ही घटना बुधवारी (१० जून) घडली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपनगरातील एका कॉलनीमध्ये सात वर्षीय पीडित मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे. दहा जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मुलगी घरासमोर खेळत होती. दरम्यान, घराशेजारी असणाऱ्या अल्पवयीन मुलाने तुझे पप्पा तुला बोलावत आहेत, असे म्हणून पीडित मुलीला घरात बोलावून घेतले आणि तिच्यावर बलात्कार केला.
यामुळे पीडित मुलगी घाबरून गेली. भेदरलेल्या अवस्थेत तिने घराकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या कुटुंबाला हे ऐकून त्यांना मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्या कुटुंबाने इस्लामपूर पोलिसात धाव घेतली. पीडित मुलीच्या आईने इस्लामपूर पोलिसात अत्याचार करणाऱ्या मुलाचे विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.