सांगली - पाच कोटी रुपये कर्ज देतो, असे सांगत शहरातील नामांकीत डॉ. विष्णू सांगरूळकर (३१) यांची ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्बास मुल्ला (मायाक्का चिंचणी, कर्नाटक) आणि संदीप, असे आरोपींचे नावे आहेत.
डॉ. सचिन सांगरूळकर यांचे एसटी. बसस्थानक परिसरात साई मल्टीस्पेशालिटी नावाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये आवश्यक नवीन मशीन खरेदी व विस्तारीकरण करण्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थापक राजेंद्र सत्रे यांना रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी कुठे कर्ज मिळते का? हे बघण्यास सांगितले. सत्रे यांनी इंटरनेटवर माहिती घेत काही माहिती त्यावर भरली. काही दिवसानंतर संदीप, असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा सत्रे यांना फोन आला. तुम्हाला कर्जाची आवश्यकता असल्यास आमच्या बालाजी फायनान्स कंपनीमार्फत तुम्हाला कर्ज मिळेल. त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे सांगत ती व्हॉटसअॅपवर पाठवण्यास सांगितले.
२५ जून २०२०ला संदीप याने सत्रे यांना फोन करत तुमची कागदपत्रे तपासण्यात आली असून तुम्हाला पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. यासाठी कागदपत्रांचे झेरॉक्स व दोन चेक द्यावे लागतील, ते तुम्ही आमच्या कंपनीचे मायक्का चिंचणी येथील हाजीसाब अब्बास मुल्ला यांच्याकडे येवून द्या, असे सांगितले. त्यानंतर २७ जूनला राजेंद्र सत्रे व नैनिषा सांगरूळकर हे मायक्का चिंचणी येथे अब्बास मुल्ला यांच्या घरी गेले. मुल्ला याने तुम्हाला ५ कोटी कर्ज मंजूर झाले असून त्याची प्रोसेसिंग फी दीड टक्के प्रमाणे ७ लाख ५० हजार भरावे लागतील, असे सांगितले. यावेळी सत्रे व सांगरूळकर यांनी आमच्याकडे आता पैसे नाहीत. आम्ही चेकने रक्कम देतो, असे सांगितले. मात्र, इन्कमटॅक्स जास्त भरावा लागत असल्याचे सांगितले.
२८ जूनला अब्बास मुल्ला हा इस्लामपूर येथे येऊन सत्रे यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये प्रोसिसिंग फी घेवून गेला. ३० जूनला डॉ. सचिन सांगरूळकर व राजेंद्र सत्रे हे अब्बास मुल्ला याच्याकडे गेले असता तुम्हाला कर्ज मिळणार नाही, तुमचे कर्ज नामंजूर झाल्याचे सांगितले. तुम्हची प्रोसिसिंग फी परत आणून देतो, असे सांगितले.
दरम्यान, ३ जुलैला दुपारी १२ च्या सुमारास अब्बास मुल्ला व इतर चार अनोळखी इसम सांगरूळकर यांच्या घरी आले. यावेळी मुल्ला याच्याकडे ७ लाख ५० हजार रुपयांविषयी चौकशी केली असता, तू मला पुन्हा पैशाची मागणी केलीस, तर तुला जीवंत ठेवणार नाही, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. यानंतर डॉ. सांगरूळकर यांनी संदीप व अब्बास मुल्ला याला पैशाची मागणी केली असता, टाळाटाळ करू लागले. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. सचिन सांगरूळकर यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.