सांगली - दुष्काळी भाग असलेल्या सांगलीच्या कवठेमहाकाळ तालुक्यातल्या विठूरायाची वाडी या ठिकाणी सात फूट लांब मगर आढळली आहे. एका शेतात ठाण मांडून बसलेल्या या मगरीला ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर अग्रणी नदीला आलेल्या पुरातून ही मगर याठिकाणी पोहचली होती.
सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहाकाळ तालुक्यात मगर सापडली आहे. विठूरायाची वाडी येथे ऊसाच्या शेतामध्ये सात फुटी मगर आढळून आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अग्रणी नदीला पूर आला होता आणि या पुराच्या पाण्यातून वाहून ही मगर या ठिकाणी पोहोचली होती.
दोन दिवसांपूर्वी तालुक्यातल्या अग्रण धुळगाव येथील पोद्दार मळा या ठिकाणी या मगरीचे दर्शन झाले होते. त्यानंतर विठुरायाची वाडी या ठिकाणी बापू माळी यांच्या शेतामध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास मगर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गावातल्या सर्वांचीच भंबेरी उडाली आणि या मगरीची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने सकाळी उसाच्या शेतात ठाण मांडून बसलेल्या मगरीला पकडण्यासाठी सापळा लावला. ग्रामस्थ आणि वनविभागाच्या माध्यमातून सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या मगरीला जेरबंद करण्यात आले आहे. या परिसरात पहिल्यांदाच सात फुटी मगर आढळल्याने तिला पाहण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली होती. वनविभागाकडून या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा - तर... भाजपा मोठा संघर्ष उभा करेल; जतच्या पाहणी दौऱ्यात दरेकरांचा इशारा