सांगली- पवार कुटुंबामध्ये फूट पडणे हे दुर्दैव म्हणावे लागेल. पण लोकसभा निवडणुकीपासूनच शरद पवार व अजित पवार यांच्यामध्ये पटत नसल्याचे जाणवत होते. जे आज प्रत्यक्षात दिसून आले, असे मत राष्ट्रवादीचे अण्णासाहेब डांगे यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना व्यक्त केले.
डांगे पुढे म्हणाले, 1995 साली शिवसेना व भाजपमध्ये असेच सरकार स्थापन झाले होते. परंतु, त्यावेळी निर्णय घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असल्याने दोन तीन तास चर्चा करून योग्य निर्णय झाला होता. आता शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे स्वतः निर्णय घेतील की संजय राऊत की आणखीन कोणाची बोलण्यासाठी मदत घेतील हे पहावे लागेल. काँग्रेसमध्येही मोठ्या मतभेदाचे व चर्चेचे वातावरण असून काँग्रेसने हिंदुत्ववाद्यांच्या बरोबर जाऊन सर्वधर्मसमभावचे धोरण सोडल्याने त्यांच्यावर होणाऱ्या टीका पक्षाला सहन कराव्या लागतील.
राजकारणामध्ये काहीही घडू शकते. परंतु, एकमेकांचे आमदार फोडून, आमदारांना आमीष दाखवून स्थापन केलेले सरकार सात ते आठ महिनेही व्यवस्थित चालू शकेल असे वाटत नाही. कारण मंत्री पदांचं वाटप करताना ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात जातील. आयाराम व गयारामांमुळे जे वातावरण निर्माण झाले आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. असे ते पुढे बोलताना म्हणाले.
अजित पवार हे विधिमंडळाचे नेते असल्याने त्यांना पदावरून काढण्यासाठी पुन्हा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवावी लागेल आणि उपस्थितांपैकी एकाने त्यांना काढून टाकण्याचा ठराव करावा लागेल. तो बहुमताने पास करूनच त्यांना पदावरून काढता येईल असेही मत अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले.