सांगली - ग्रामीण भागातील गर्भवती महिलांमध्ये कोरोनाची मोठी धास्ती निर्माण झाली आहे. गर्भावस्थेत कोरोना झाल्यास महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत अनेक स्तरावर प्रबोधन होत आहे. सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. रवींद्र आरळी यांनी याबाबत आता पुढाकार घेत जतमध्ये ग्रामीण भागातल्या गर्भवती महिलांसाठी मोफत तपासणी सुरू केली आहे. त्यानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना डॉ. रवींद्र आरळी यांनी गरोदर अवस्थेतील महिलांना कोरोना झाल्यास नेमकी काय काय काळजी घेतली पाहिजे? याबाबत मार्गदर्शन केले आहे.
ग्रामीण भागात गरोदर महिलांच्या मध्ये अधिक भीती -
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रत्येकाला आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी लागली आहे. त्यात घरात एखादी महिला गरोदर असेल तर ती चिंतेची बाब बनली आहे. ज्या महिलांना गर्भावस्थेत कोरोना झाला त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे गरोदर महिलांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाच्या बाबतीत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मात्र, या परिस्थितीमध्ये गरोदर महिलांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. विशेष काळजी घेतल्यास मातेला आणि तिच्या बाळाला काही होत नाही, असे मत सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉ. रवींद्र आरळी यांनी व्यक्त केले आहे. गर्भावस्थेतील महिलांमधील ही भीती आणि त्यांच्यावर तातडीने उपचार तपासणी करण्याच्या दृष्टीने डॉ. आरळी यांनी आता पुढाकार घेतला आहे. जतमध्ये त्यांनी ग्रामीण भागातील गरोदर महिलांसाठी मोफत तपासणी सुरू केली आहे.
हेही वाचा - चक्रीवादळापेक्षाही कोरोनावादळाला थांबवणे गरजेचे - संजय राऊत
महिलांनी घाबरून जाऊ नये -
डॉ. आरळी ईटीव्ही भारतसोबत बोलताना म्हणाले की, यात गरोदर अवस्थेतील महिलांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी आपण सर्वतोपरी सेवा चालू केली आहे. जर तुम्ही गरोदर असाल, तुम्हाला ताप आला किंवा नव्याने, सततचा खोकला सुरू झाला, तर तुम्ही पाच दिवस घरातच राहायला हवे. यानंतर जर पाच दिवसांतही तुमची स्थिती सुधारली नाही तुमचा आजार वाढतच गेला किंवा घरात राहून या स्थितीवर मात करता येणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर घाबरून न जाता पुढील उपचारांसाठी तुम्ही रुग्णालयात दाखल झाले पाहिजे.
गरोदर अवस्थेतील कोरोनाचे लक्षणे -
गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः पोट दुखणे, रक्तस्राव, अचानक गर्भाचा मृत्यू, कमी दिवसांमध्ये बाळंतपण, ऑक्सिजनची गरज वाढणे ही लक्षणे गरोदर महिलांच्या दिसत आहेत. गर्भावस्थेत महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. या बदलांमुळे त्यांना कशाचाही संसर्ग किंवा तापासारखा आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळेच गरोदर महिलांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आणि स्त्रीरोग तज्ज्ञाकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही डॉ. आरळी म्हणाले.
हेही वाचा - खोदकामात सापडले चक्क १ एकर तळे, दलदलीत दडलेले ऐतिहासिक बांधकाम समोर