सांगली - टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या लालपरीला मालवाहतूक सेवेमुळे मोठा आधार मिळाला आहे. प्रवासी वाहतूक ठप्प झाल्यानंतर एसटी विभागाने मालवाहतूक सेवा सुरू केली. सांगली एसटी विभागानेही मालवाहतूक सेवा सुरू करत, मागील 3 महिन्यात तब्बल 50 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे मालवाहतूक सेवाही एसटीसाठी जणू आधारच ठरली आहे.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून टाळेबंदी घोषित झाली होती. परिणामी प्रवासी वाहतुकही बंद झाली. त्यामुळे एसटीचे उत्पन्न थांबले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात एसटी सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यावेळी पहिल्या टप्प्यातील वाहतूक सूरू करताना माल वाहतूक करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. त्यानुसार सांगली एसटी आगारानेही माल वाहतूक सेवा करण्याची तयारी केली.
सुरुवातीला 10 एसटीचे रूपांतर हे मालवाहतूक गाड्यांमध्ये करण्यात आले. त्यानंतर सांगली एसटीने वाहतुकीचे प्रतिटन दर मर्यादित ठेवल्याने मोठ्या प्रमाणात या वाहतुकीसाठी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जवळपास 30 हून अधीक एसटीचा मालवाहतुकीसाठी वापर केला जात आहे. सांगली विभागाने अकोला, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे या विभागांमध्ये 30 मालवाहतूक बस गाड्यांमधून 550 फेऱ्या करत जवळपास 50 लाखांचे उत्पन्न मिळवले. लांब पल्ल्याची मालवाहतूक असेल तर त्याठिकाणी दोन चालकांची सोय करून एसटीने कामगिरी निभावली.
पहिल्यांदा सुरू केलेल्या एसटी बस मालवाहतुकीला व्यापारी, कारखानादारांंचा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र हळूहळू एसटीने खत वाहतुकीची सुरुवात केली. त्यांनतर ट्रान्सपोर्ट कंपन्यांशी संपर्क करत तेथून एसटी मालवाहतुकीला व्यावसायिक रूप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे एसटीच्या मालवाहतूक सेवेला मोठा प्रतिसाद आता मिळत आहे.
एसटी सेवा सुरू झाली तरी सोशल डिस्टंसिंगच्या नियमामुळे केवळ 22 प्रवासी वाहतुकीला परवानगी आहे. तर एसटीच्या तिकीट दरांमध्ये मात्र कोणतीच वाढ नाही. अशा परिस्थितीमध्ये एसटीला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मालवाहतूक सेवा ठरत आहे. त्यामुळे कोरोनानंतर जनजीवन सुरळीत झाले तरी प्रवासी सेवा देण्याबरोबर एसटी मालवाहतूक सेवाही कायम ठेवण्याचा मानस सांगलीच्या एसटी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - पंतप्रधानांच्या वाढदिवशी काँग्रेसने साजरा केला 'बेरोजगार दिन'