सांगली - शहरातील पक्षीप्रेमी अवलियाने पक्षांच्यासाठी "वेस्ट टू बेस्ट फूड होम"ची निर्मिती केली आहे. पत्र्यांच्या डब्याच्या माध्यमातून पक्षांसाठी अन्न-पाणी ठेवण्याचे कल्पक,अशी घरटी बनवले आहेत. संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून आता ही खुले पिंजरे मोफत वाटप करण्यात आले आहे.
शहा हे मुळचे उद्योजक आहेत आणि त्यांची सामाजिक संस्था असणाऱ्या संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्न पुरवण्याचे काम करण्यात येते. अन्न शिजवण्यासाठी तेलाची डबे आणले जातात, तर रिकामी तेलाचे डबे काय करायचं असा प्रश्न शहा यांच्या समोर होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी त्यामध्ये झाडे लावून या टाकाऊ डब्यापासून काहीतरी उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला. यातूनच त्यांच्या डोक्यामध्ये या डब्यांच्या माध्यमातून पक्षांना पाण्यासाठी आणि अन्नासाठी उपयोग करता येऊ शकतो का ? हा विचार आला. त्यातून त्यांनी कल्पकतेने त्यांचं रूपांतर पक्षांच्या खाण्या-पिण्याच्या खुला पिंजाऱ्यामध्ये केले आहे. डब्याच्या चारी बाजूने चौकोनी भाग खुला करण्यात आला आहे. मध्यभागी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अगदी सहजरित्या घर, छत, झाड कुठे ही अडकवता येतील अशी, ही घरटी बनवली आहेत. पत्र्यांची असल्याने या ठिकाणी बसल्याने त्यांना इजा होऊ शकते, या काळजीने त्याला पावडर कोटींगही करण्यात आले आहे. ज्यामुळे पत्र्याच्या काटावर बसल्याने कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.
प्राणी-पक्षी प्रेमी असल्याने शहा ही घरटी मोफत उपलब्ध करून देतात. उन्हाळा,पावसाळा कोणत्याही ऋतुमध्ये याचा आसरा सुद्धा पक्षांना घेता येऊ शकतो. शिवाय धान्य-पाण्याची सोय सुद्धा यामध्ये होणार आहे. मिरज एमआयडीसीमध्ये शहा यांच्या कारखान्यात या कल्पक घरट्यांची निर्मिती केली जात आहे. आता त्याला मागणीही वाढू लागली आहे. भंगारात टाकून देण्या ऐवजी पत्र्यांच्या डब्यांचा कल्पक वापर करून त्यातून पक्षांच्या घरट्यांचा केलेली निर्मिती ही नक्कीच कौतुकास्पद आहे.