सांगली - संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वरांवर सांगली जिल्हा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. तब्बल ८ हजार दुचाकी जप्त करण्यात आल्या. यामुळे विनाकारण रस्त्यावर दुचाकी घेऊन फिरणाऱ्या टवाळखोरांना चाप बसला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला व संचारबंदी जाहीर करत विनाकारण घरातून बाहेर पडण्याच्या सक्त सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही संचारबंदीच्या काळात अनेक लोक आपली दुचाकी घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरत होते आणि अशा या दुचाकीस्वारांच्या विरोधात सांगली पोलिसांकडून गेल्या पंधरा दिवसांपासून धडक कारवाई सुरू करण्यात आली होती.
जिल्ह्यातील सुमारे आठ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी गाड्या जप्त करत संबंधितांना दंड ठोठावला आहे. त्यापैकी साडेसहा हजार दुचाकीस्वारांनी प्रत्येकी १ ते २ हजार रुपयांचा दंड भरून लॉकडाऊन संपेपर्यंत आपल्या गाड्या पुन्हा रस्त्यावर आणणार नाही, या अटीवर परत देण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही दीड हजार गाड्या पोलिसांच्या ताब्यात असून त्या ठिकठिकाणी लॉक करून ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गाडया जप्त करण्याचीही कारवाई सुरूच असल्याने विनाकारण दुचाकीवरून बाहेर फिरणाऱ्यांना चाप बसला आहे.