इस्लामपूर (सांगली) - पोलीसच भक्षक झाल्याची खळबळजनक घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. इस्लामपूर शहरात महाविद्यालयीन युवकावर पोलिसानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना रविवारी समोर आली. हा प्रकार २९ ऑक्टोबरला घडला असून या अत्याचाराची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत रविवारी पुन्हा अनैसर्गिक संभोग करण्याची मागणी या पोलिसाने केल्यावर युवकाने पोलिसात धाव घेतली. संशयित पोलिसाने पीडित युवकाकडून चार हजाराची खंडणीसुद्धा उकळली आहे. हणमंत कृष्णा देवकर (३४, रा. राजेबागेश्वरनगर, इस्लामपूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर याच्यावर कॉलेजच्या मुलावर अनैसर्गिक बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे. याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.
आरोपी पोलीस कर्मचाऱ्यानं आधी पीडित तरुणाकडे त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर मागितला व तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला विरोध दर्शवत मैत्रिणीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणांकडे पैशाची मागणीही केली. तसेच मैत्रिणीसोबत शरीरसंबंध ठेवायला देत नसशील तर मी तुझ्यासोबत शरीरसंबंध करणार असे म्हणत, व्हिडिओ शूट करत युवकावर अनैसर्गिक संभोग केला. इस्लामपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यानं केलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे पोलिसांचे नाव बदनाम होत आहे.
काय आहे प्रकार -
इस्लामपूर पोलीस ठाण्यात नेमुणकीस असलेला पोलीस कर्मचारी देवकर व त्याच्या बरोबर असलेले पोलीस २७ ऑक्टोबरला पहाटे तीन वाजता पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पीडित मुलगा हा त्याच्या मैत्रिणीस भेटून त्याच्या वसतीगृहात जात होता. आरोपी हणमंत देवकर व अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला अडवून यावेळी कोठून आलास असे विचारले. त्यावेळी पीडिताने आपण मैत्रिणीला भेटून आल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपी हणमंत देवकर याने पीडितास संपूर्ण माहिती विचारली असता तरुणाने सर्व माहिती व आपला मोबाईल नंबर दिला.
२९ ऑक्टोबर रोजी पीडितास आरोपीने फोन करून कॉलेजच्या गेटवर भेटायला बोलावले. तरुण आरोपीला भेटायला गेला असता त्याला प्रेमप्रकरणावरून धमकावून पैशाची मागणी करत मैत्रिणीच्या घरी सांगण्याची धमकी दिली. त्यावेळी तरुणाने घाबरून कॉलेजमधील मित्रांकडून चार हजार रुपये उसणे घेवून पोलीस हणमंत देवकर याला दिले. परंतु त्याचे समाधान झाले नाही. आरोपी हणमंत देवकर याने पीडितास तुझ्या मैत्रिणीचा नंबर मला दे व तिला माझ्यासोबत सेक्स करायला सांग, असे सांगितले. त्यावेळी पीडिताने ती मुलगी चांगली आहे व तसे करण्यास स्पष्ट नकार दिला.
त्यावेळी आरोपी हणमत देवकर याने पीडितास तु मला तुझ्या मैत्रिणीसोबत जर सेक्स करायला देत नसशील तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार, असे म्हणाला. त्यावर पीडित मुलगा घाबरला. आरोपी हणमंत देवकर याने पीडितास तुझ्या रूमवर चल, मला तुझ्यासोबत सेक्स करायाचा आहे, असे सांगितले. नंतर त्या पीडिताने आपल्या मित्रास दुसऱ्या रूममध्ये जाण्यास सांगितले. तेथे आरोपी हणमंत देवकर याने पीडित तरुणाबरोबर अनैसर्गिक संबंध केले व त्याचा व्हिडिओ शूट केला. 21 नोव्हेंबर रोजी आरोपी हणमंत देवकर याने पुन्हा पीडित मुलास त्याचे मोबाईलवरती फोन करून कॉलेजच्या गेटवर बोलावून संबंध ठेवण्याची मागणी केली व मोबाईलमधील अनैसर्गिक संबंधाचा व्हिडिओ दाखविला व हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
या प्रकाराबाबत पीडिताने त्याच्या मित्रास सांगून इस्लामपूर पोलीस ठाणे गाठले व आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. कलम ३८४,३७७ , ५०४ , ५०६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम - ६७ प्रमाणे २१ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करणेत आला. गुन्हयातील आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हणमंत देवकर याला अटक करण्यात आली आहे.