सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये आणि नागरिकांनी घरातच बसून राहावे यासाठी सांगली महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. आता सांगली महापालिका नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची सेवा घरपोच देणार आहे. यासाठी मनपा क्षेत्रात वॉर्ड संनियंत्रण समितीची रचना करण्यात आली असून उद्या 26 मार्चपासून सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची होम डिलीव्हरी केली जाणार आहे.
मनपा क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या वॉर्ड संनियंत्रण समितीमध्ये मनपाचा समन्वयक अधिकारी, स्थानिक सर्व नगरसेवक, चार कर्मचारी आणि प्रत्येक समितीसोबत एक पोलीस कर्मचारी असणार आहे. ही समिती नागरिकांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना घरपोच साहित्य पोहोचवणार आहेत. यामुळे नागरिकांची घरबसल्या सोय होणार असून नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. यासाठी हे नियोजन केल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले .