सांगली - महापालिकेने संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. ‘आपत्ती मित्र’ असे या अॅपचे नाव असून, आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते अॅपचे लोकार्पण करण्यात आले. आपत्ती काळात मोबाईल अॅपद्वारे नागरिकांना मदत मिळवण्याबरोबर पूर पातळीचे अपडेट मिळणार आहेत. अशा प्रकारचे अॅप तयार करणारी सांगली महापालिका राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचा दावा करण्यात आला आहे.
गत वर्षी आलेल्या महापुरामुळे सांगलीमध्ये मोठे नुकसान झाले. आपत्तीला तोंड देताना पालिका प्रशासनाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. यासर्व बाबी विचारत घेता पालिकेने यंदा संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन अनेक पातळ्यांवर तयारी केली आहे. पुराला तोंड देण्यासाठी अद्यावत यंत्रणाही सज्ज केली आहे. यामध्ये सांगलीकर नागरिकांना आणि प्राशसनाला उपयुक्त अशा मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपला ‘आपत्ती मित्र’ असे नाव देण्यात आले आहे. अॅपचे लोकार्पण करताना, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत आणि आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी सभापती संदीप आवटी, गटनेते युवराज बावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘आपत्ती मित्र’ अॅपचा असा होणार फायदा -
अॅपमध्ये संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवा तसेच महापुराबाबत सर्व माहिती मिळणार आहे. याचबरोबर चांदोली, अलमट्टी धरणाच्या पाणी पातळी बरोबर विसर्गाची तातडीची माहितीही या अॅपमध्ये मिळणार आहे. तसेच महापूर आल्यास नागरिकांनी पाणी पातळी निवडली तर तर त्यांना त्या पातळीवेळी पाणी कुठे कुठे पोहचेल याची नकाशासहित माहिती उपलब्ध होणार आहे. याचवेळी आपत्कालीन सेवा तसेच प्रशासनाच्या सूचना, महत्वाचे फोन नंबर, नियंत्रण कक्षाचे नंबर सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
अॅपमुळे नदीकाठच्या विशेष करून पूर पट्ट्यातील नागरिकांना महापुराबाबत दक्षता घेण्यास आणि संभाव्य पुराची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना आपला बचाव आणि आपल्या साहित्याचे नुकसान वाचवता येणार आहे. मागील महापुरामध्ये आलेल्या अनेक अडचणी आणि त्रुटींचा विचार मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि प्रशासनाने हे अॅप तयार केले आहे.