सांगली - थकीत मजुरीसाठी हमाल तोलाईदारांनी सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर हल्लाबोल केला. तोलाईदारांनी कार्यालयात घुसून सर्वसाधारण सभा उधळून लावली.
सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या भुसारी व्यापाऱ्यांकडून हमाल तोलाईदारांची मजुरी थकीत आहे. हमाल-तोलाईदरांचे थकीत देणे व्यापाऱ्यांनी तातडीने द्यावेत, यासाठी तोलाईदार संघाच्या वतीने मार्केट यार्डात धरणे आंदोलन सुरु आहे. गेल्या ३ दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून, या आंदोलनाकडे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या हमाल तोलाईदारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर हल्लाबोल करत बाजार समितीच्या संचालकांची सुरु असलेली सर्वसाधारण सभा उधळून लावली.
मीटिंग सुरु असताना हमाल-तोलाईदारांनी कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कार्यालयात गोंधळ उडाला. त्यामुळे सुरु असलेल्या सभेचे कामकाज बंद पाडले. त्यानंतर संचालकांकडे व्यापाऱ्यांनी तोलाईदरांची थकवलेली मजुरी तातडीने देण्यासाठी कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली. तसेच येत्या २ दिवसात थकीत मजुरी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी तोलाईदरांनी दिला.