सांगली - जिल्ह्यात सध्या महापूराने थैमान घातलेल आहे. वारणा आणि कृष्णाकाठच्या शंभरहून अधिक गावांना महापुराचा विळखा पडलेला आहे. त्यामुळे, नदीकाठच्या 70 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यासोबतच हजारो जनावरांचे देखील स्थलांतर करण्यात आले आहे. पूर परिस्थिती पाहता, या ठिकाणी आता लष्कराला सुद्धा पाचारण करण्यात आलेले आहे.
सांगलीच्या पाणी पातळीने 2005 च्या महापुराचा रेकॉर्ड तोडला आहे. आता पाण्याची पातळी 54 फुटांच्या पुढे पोहोचली आहे. तर, पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होत असल्याने सांगली शहरातल्या अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरू लागले आहे.
सांगली शहरालासुद्धा या महापुराने वेढा घातला आहे. सांगलीची मुख्य बाजारपेठ तसेच आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे. पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होत असल्याने हे पाणी शहराच्या अनेक भागात आता शिरू लागले आहे.
शंभरहून अधिक गावांना पुराचा वेढा पडल्यामुळे, विद्युत पुरवठा तसेच पाणी पुरवठा खंडित झाला आहे. शहरातले त्याचबरोबर ग्रामीण भागातले अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. सांगलीसह पूर भागांमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी महाविद्यालये आणि शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पुराची पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि लष्कराला पाचारण करण्यात आले असून, एनडीआरएफच्या तीन तुकड्या आणि लष्कराची एक तुकडी याठिकाणी दाखल झाली आहे. नदीकाठी पुरात अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.