सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेची ऑनलाईन महासभा पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महापौर आणि आयुक्तांनी ही सभा घेतली, तर नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी आपल्या घरी आणि कार्यालयातून या सभेत ऑनलाईन महासभेत सहभाग घेत सभेचे कामकाज केले. ऑनलाईन पद्धतीने महापालिकेचे विशेष सभा घेणारी सांगली महापालिका पहिलीच महापालिका असल्याचा दावा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केला आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आलेल्या निकषानुसार एकत्र बोलावून कोणतीही सभा बैठक घेण्यास बंदी आहे. मात्र, कोरोना विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा घेण्याबाबत महापौर गीता सुतार आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्यात चर्चा झाली. या चर्चेअंती आयुक्त कापडणीस यांनी याबाबत नियोजन करीत व्हिडिओ कॉन्फरसनद्वारे सभा घेण्याचे नियोजन केले. त्यानुसार सांगली महापालिकेच्या सभागृहात सोमवारी विशेष ऑनलाईन महासभा पार पडली. यासाठी स्वतंत्र स्क्रिन लावण्यात आला होता, तर संगणकाचा वापर करीत या सभेचे कामकाज सुरू झाले. या ऑनलाईन महासभेत सांगली महापालिका क्षेत्रातील नगरसेवक तसेच पालिकेचे सर्व अधिकारी यांनी आपल्या घरात, कार्यालयात बसून सहभाग घेतला. कोरोनाबाबत काय उपाययोजना केल्या? किट वाटपाबाबत काय नियोजन आहे? परप्रांतीय मजुरांबाबत काय नियोजन आहे? यासह शेरीनाला, अमृत योजना, रस्ते पॅचवर्क, औषध फवारणी, शहरात होणारी गर्दी, प्रभाग निधीतील कामे यासह अनेक महत्वाचे विषय नगरसेवकांनी ऑनलाईन सभेत मांडले. या सर्वच प्रश्नांची सकारात्मक उत्तरे आयुक्त नितीन कापडणीस आणि महापौर गीता सुतार यांच्याकडून देण्यात आले.
तसेच पावसाळी नियोजनासाठी नाले सफाई सुरू झाली असून संभाव्य आपत्ती लक्षात घेता सर्व यंत्रेणेला आत्तापासूनच सक्षम बनवले जात असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सभागृहाला सांगितले. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या ऑनलाईन महासभेला नगरसेविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच सकारात्मक चर्चा केली असल्याचे महापौर गीता सुतार यांनी सांगितले.