सांगली - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपाच्यावतीने सांगलीत आंदोलन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार असल्याचा आरोप करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हे तर 'महावसुली' सरकार..
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केले आहे. यानंतर राज्यभर या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख आणि आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राज्यभरात अनेक ठिकाणी गृहमंत्र्यांच्या मागणीसाठी भाजपाचे आंदोलन -
राज्यात नागपूर, अकोला, गोंदियासह अनेक ठिकाणी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.